पुणे : पुणे महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत शहरातील रस्ते खोदाईच्या संदर्भात काही निकष लागू करण्यात आले होते. त्यानुसार, पावसाळा संपल्यानंतर १५ मे पर्यंत पाणी, ड्रेनेज आणि केबल आदी कारणांसाठी रस्ते खोदाईचे काम हाती घेण्यात येत होते. १५ मे नंतर कोणत्याही प्रकारे खोदाईची कामे न करता १५ ते ३१ मे दरम्यान मान्सूनपूर्व कामांची दुरुस्ती करून शहराला पावसाळ्याला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवले जात होते. परंतु, पुढील वर्षी महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीवर डोळा ठेवून सत्ताधाऱ्यांकडून या निकषांना हरताळ फासला जात आहे. केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी शहरात आजही तीनशे ते चारशे कोटी रुपयांच्या कामांच्या माध्यमातून लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता अशा विविध रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे.
अनधिकृत केबल खोदाईसाठी परवानगी दिली जात आहे. या सर्व बाबी आक्षेपार्ह असून, त्यामुळे पुणेकर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. पुढील वर्षी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहेत. या महापालिका निवडणूकीचा मिळणारा मलीदा चाखण्यासाठी भाजप सत्ताधाऱ्यांकडून शहर खोदले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू असलेल्या मनमानी धोरणांविरोधात आज, गुरुवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला.विविध ठिकाणी केलेल्या खोदकामांमुळे गेल्या दहा-बारा दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. केवळ स्वत:च्या फायद्यासाठी वाहनचालक व पादचाऱ्यांना जागोजागी त्रास सहन करावा लागत आहे. ही पुणेकरांची फसवणूक असून, पुणेकरांची गैरसोय करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. तसेच, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या मुख्य सभेत महापालिकेच्या सेवक व अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.
Read Also :
- ग्लोबल टेंडर ‘तुझ्या बापाला’ दिलं; महापालिकेनं रद्द केलं
- ‘ED, CBI ची धमकी भारी, कुंकू वाचवायला कमळीच्या दारी’
- ‘अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे प्रतिमेला तडा गेला’
- ‘…तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल’