पुणे : अॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठी भाषेला स्थान देण्यात यावे, अशी मागणी करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालय आणि गोदामाची तोडफोड केली होती. मनसेच्या खळखट्याकनंतर अॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेत, मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते.
या प्रकरणी कोंढवा बुद्रुक परिसरातील अॅमेझॉनच्या गोदामात तोडफोड करणाऱ्या मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली असून, त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमित अशोक जगताप (वय 40), सौरभ दीपक टिळेकर (वय 22), रोहित शाहू सोनावणे (वय 30), मयुर प्रकाश जगताप (वय 27), आकाश साधू आवटे (वय 24), अक्षय सुरेश जगताप (वय 25), मयुर शांताराम चव्हाण (वय 28) आणि निखील शांताराम जगताप (वय 27, रा. सर्वजण- कोंढवा बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हा दाखल केल्यापासून हे आरोपी फरार होते. आरोपींचे वकील अॅड रुपाली ठोंबरे व अॅड विजय ठोंबरे यांनी बाजू मांडत पोलीस कोठडीला विरोध केला. मात्र न्यायालायाने आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.