मुंबई : राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून काँग्रेसचे सेक्यूलर भूमिकावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याला थोरात यांनी उत्तर दिले.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला.
नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? pic.twitter.com/Zvd437Ufym
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 17, 2021
थोरात म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे.
राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात कडे जनता करमणूक म्हणून बघते आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेसह भाजपवर देखील निशाणा साधला.
महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही, असे म्हणत थोरातांनी भाजपला टोला लगावला.
Read Also :
- ‘तथाकथित पत्रकार पंतप्रधान कार्यालयाचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहे’
- ‘… आता बुटांनी हिशोब होईल’, तांडववरून राम कदम आक्रमक
- ‘… त्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना लोक बघतील तरी’, भाजपचा खोचक टोला
- कृषी कायद्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरणार
- … अन् आमदाराने जाहीर कार्यक्रमात थेट सुप्रिया सुळेंकडे केली मंत्रिपदाची मागणी