मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंड मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार मैदानात उतरले असताना भाजपने देखील मोठी खेळी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच यावर कोणतंही भाष्य केलं नाही. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण देरकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे आता राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
प्रवीण दरेकर यांनी राज्यापालांना पाठवलेलं पत्र.
दिनांक 24 जुन, 2022
प्रति, मुंबई, दि. 24 जुन 2022
मा. भगतसिंह कोश्यारीजी
महामहीम राज्यपाल, महाराष्ट्र
विषय : राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत
महोदय,
कोरोनाच्या संसर्गातून आता आपली प्रकृती सुधारत असलेच, आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो.
एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि त्यानंतर स्वत: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.
अशातच राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशुन्य असलेले महाविकास आघाडी सरकार कोट्यावधी रूपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल आणि अन्य महत्वाच्या विभागातील बदल्यांच्या सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापुर्वी पोलिस दलात झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे.
महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे.
प्रवीण दरेकर
विरोधी पक्षनेता विधान परिषद
Read also:
- शिंदेंचा बंड मोडून काढण्यासाठी शरद पवार मैदानात; शरद पवार संकंटमोचक ठरणार?
- “नीट शेतीची काळजी घेतली असती तर हातातलं पीक कोणी घेऊन गेलं नसतं “; राऊतांना भाजपचा टोला
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
- सगळं ठरलंय, फडणवीस मुख्यमंत्री, अन् शिंदे साहेब उपमुख्यमंत्री; बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल