सोलापुर : सोलापुर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात सरळ लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार करण्यास जोरदार सुरूवात केली आहे. यातच लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची सुशील कुमार शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली असल्याची माहिती समोर येत आहे. सोलापुर लोकसभा मतदारसंघात १९ लाख ७२ हजार मतदारांपैकी जवळपास ६ ते ७ लाख मतदार हे लिंगायत समाजाचे असल्याने या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
लिंगायत समाजातील मानाचे दैवत म्हणून ओळख असलेल्या ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांचे मंदिर सोलापुरात असून या मंदिराचे प्रमुख धर्मराज काडादी आहेत. यांच्यासह लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत सुशील कुमार शिंदे यांची सोलापुर शहरातील एका मंगल कार्यालयात गोपनीय बैठक शुक्रवारी पार पडली. ही बैठक लिंगायत समाजाचे सुरेश हसापुरे यांच्या पुढाकाराने घेतली असून लिंगायत समाज कॉंग्रेसच्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्यामुळे या विधानानंतर आता भाजपच्या मनात चांगलीच धडकी निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“सुपारी वाजवणारा” अशी पदवी देवेंद्र फडणवीस यांनीच राज ठाकरेंना दिली, कुणी डिवचलं ?
सोलापुर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा देखील लिंगायत समाजात मोठा दबदबा आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघात जवळपास ८० ते ९० हजार लिंगायत समाजाचे वास्तव्य आहे. याच जोरदावर देशमुखांनी विधानसभेत एंन्ट्री केल्याचे दिसून येत आहे. अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी तर दक्षिण सोलापुरमधून आमदार सुभाष देशमुख हे देखील भाजपचे आमदार आहेत. या मतदारसंघातही लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे.
दरम्यान, लिंगायत समाजाची झालेल्या बैठकीचे काही फोटो व्हायरल झालेत. धर्मराज काडादी यांनी बोलतांना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. तर भाजपने कशा पद्धतीने आतापर्यंत त्रास दिलाय. याचीही चर्चा करण्यात आली असल्याचीही माहिती समोर आलीय. याच बरोबर तुकाराम मुंडे जिल्हाधिकारी असताना, आपत्कालीन रस्त्याचं कारण देत सिद्धेश्वर महायात्रेत बंधने लावण्यात आली होती. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला देखील वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. साखर कारखान्याच्या चिमणीला राजकीय स्वरूप देत पाडण्यात आली. याचाही चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे सोलापुर लोकसभा निवडणुकीत आता लिंगायत समाजाची मतं गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…““..त्यामुळेच मला पुण्याचा खासदार व्हायचंय”, वसंत मोरेंनी सांगितला धक्कादायक अनुभव