पुणे : दरवर्षी 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे अत्यंत उत्साहाने पार पडणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन शौर्य दिन सोहळ्यावर यंदा कोरोनाचे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
1 जानेवारीला विजयस्तंभाजवळ प्रचंड गर्दी होत असते. यामुळे या ठिकाणी नागरिकांना गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, जाहीर सभा, खाद्यपदार्थ आणि पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शन आणि अन्य समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शौर्य दिन सम्नवय समितीने देखील विजयस्तंभाला घरून अभिवादन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून महानगरपालिका क्षेत्रात रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार आढळल्याने सरकारकडून सरकारकडून पावले उचलली जात आहेत.