सोलापूर :महापालिकेचे विरोधीपक्षनेतेच राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. विरोधीपक्ष नेते महेश कोठे हे विधानसभा निवडणुकांपासून नाराज होते. उद्या मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची माहिती स्वत: महेश कोठे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
महेश कोठे हे सोलापूरातील शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पक्षातर्फे कोठे यांना डावलून मानेंना विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली. पक्षावर नाराज असलेल्या कोठेंनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक देखील लढवली. मात्र त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. पक्षाशी बंडखोरी केल्यानंतर देखील पालिकेतील विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी महेश कोठे यांच्यावर कायम होती.
मात्र नाराज असलेल्या कोठेंनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती महेश कोठे यांनी स्वत: दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला कायम आदर होता. तो पुढे देखील राहिल. पक्ष वाढवण्यासाठी मी मेहनत घेतली होती. विधानसभेच्या जागेवर माझा हक्क होता. मात्र मला संधी न देऊन डावलण्यात आलं. तेव्हापासून मी नाराज होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मी भेटण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र मधल्या काही लोकांनी भेट देखील होऊ दिली नाही. मी राष्ट्रवादीत जरी प्रयत्न करत असलो, तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलाताना कोठे यांनी दिली.
Read Also
नितीन गडकरींनी घेतली मनोहर जोशींची भेट; जुन्या आठवणींना दिला उजाळा
मराठा समाजाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विनायक मेटे यांच्यात बैठक