मुंबई : कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून मुंबईतील लोकल ट्रेनसेवा बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भितीने राज्य सरकारकडून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर जानेवारी 2021 च्या सुरुवातीला राज्य सरकार सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा विचार करत असल्याची माहिती, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मुंबई लोकल जानेवारीमध्ये सर्वांसाठी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. कशापद्धतीने मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित असावा यासंदर्भातील सरकारची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याचा आमचा विचार आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
अनलॉकच्या प्रक्रियेत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्याने वकील, शिक्षक आणि महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. आता लवकरच सर्वांसाठी ही सेवा सुरू केली जाणार आहे.
वडेट्टीवार यांनी माहिती दिली की, कुणीही मास्क न घालता ट्रेनमध्ये चढणार नाही. गर्दी कशी नियंत्रणात ठेवता येईल, त्यासाठी पोलीस व अन्य मनुष्यबळ नेमकं किती लागेल, यासाठीची चाचपणी पूर्ण झाली आहे. त्यामुळं नवीन वर्षात लोकल सुरू होऊ शकते. पहिल्या तारखेपासूनच सर्वांसाठी लोकल खुली करण्याचा प्रयत्न आहे.
रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक अॅप तयार केले जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.