बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातातील गोष्टी करायला हव्या होत्या, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले आहे.
ते म्हणाले, मी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचे स्वागत करतो. आम्ही बीडमध्ये काढलेल्या मोर्चानंतर राज्य सरकारला जाग आली. त्यामुळे आता मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीत मुख्यमंत्री पंतप्रधानांसमोर नेमके काय मुद्दे मांडणार आहेत, काय मागण्या करणार आहेत, हे जनतेला समजायला पाहिजे होते. तसेच या भेटीपूर्वी राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारितील निर्णय घेतले पाहिजे होते. मराठा तरुणांची प्रलंबित नियुक्ती मार्गी लावणे, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सोयी-सवलती देणे, या गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत. मात्र, गोष्टी न करता मुख्यमंत्री आता पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी जात आहेत. ही गोष्ट आकलनापलीकडची आहे, असे विनायक मेटे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. यावेळी आघाडी सरकारमधील काही मंत्री त्यांच्यासोबत असतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
Read Also :
- सरकार काही जात नाही, फडणवीस तुम्ही सरकार पडण्याची वाटच बघा – एकनाथ खडसे
- नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; खडसेच्या टिकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
- मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान मोदींना भेटणार
- .‘कोविडला निमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची काय लायकी राहिली असती