पुणे : कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णा यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. भाजपाच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर त्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मेधा कुलकर्णी यांच्यासह सहा जणींची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मालती रॉय (पश्चिम बंगाल), दर्शना सिंह (उत्तर प्रदेश), रेखा गुप्ता (दिल्ली), विरेंदर थांडी (पंजाब), ज्योतीबेन पांड्या (गुजरात), पूजा मिक्षा (राजस्थान) यांचा समावेश आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सहमतीनंतर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. सुखबीर कौर, इंदु बाला गोस्वामी आणि दीप्ती रावत यांची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुलकर्णी यांच्या रूपाने पुण्यातील महिलेला पहिल्यांदाच एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या त्या एकमेव पदाधिकारी आहेत.
सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यानतर २०१९च्या निवडणुकीत भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिल्याने कुलकर्णी यांचा पत्ता कापला गेला. त्यानंतर कुलकर्णी यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे बोलले जात होते. मात्र, अद्याप त्यांना ही जबाबदारी दिली गेली नव्हती. त्यातच तिकीट कापले गेल्याने कुलकर्णी नाराज असल्याचीही चर्चा होती. परंतु, आता त्यांना थेट राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. ‘गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल पक्षाने घेतली असून, दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडेन,’ अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मेधा कुलकर्णी कोण आहेत?
मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. २०१४ मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध ६४ हजार मतांनी विजय मिळवला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं.
विधानपरिषदेचीही उमेदवारी डावलल्याने आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले होते. पुणे पदवीधर मतदारसंघातूनही मेधा कुलकर्णींना डावलण्यात आलं होतं. दरम्यान, मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असं त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी त्यावेळी व्यक्त केली होती.
Read Also :
- “कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता एकतर्फी होणार”, डॉ. अतुल भोसलेंची वाळव्यात गर्जना
- राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…
- संघ भाजपच्या बैठका; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात भाजप आमदाराची नाराजी
- बाळासाहेबांच्या बोटाला धरून भाजपा राज्यात वाढला त्याचा शिवसेनेला त्रास !
- “आमदार सरनाईक आणि त्यांचा लेटरबॉम्ब हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न”- देवेंद्र फडणवीस