नांदेड : माजी मुख्यमंत्र्यांची ‘मी पुन्हा येणार’ म्हणण्याची सवय अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्पला लागली. आपली नकोशी अशी सवय तिकडे गेली आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
नादेंडमधील उमरी येथील प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कवळे गुरूजींच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने उमरी शहरातून एक रॅलीही काढण्यात आली. यावेळी सभेला संबोधित करताना अशोक चव्हाणांनी टोलेबाजी केली.
नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. लोकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, सरकार आपले आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळ आपले आहे. मी पुन्हा येणार म्हणणाऱ्याला बाहेर ठेवण्याचे काम महाविकास आघाडीने केले. माजी मुख्यमंत्र्यांची मी येणार म्हणण्याची सवय ट्रम्पला लागली. ट्रम्प जाताजात मी पुन्हा येणार म्हणून गेले, आपल्या नको त्या सवयी तिकडे गेल्या आहेत, असा टोला चव्हाण यांनी फडणवीसांना लगावला.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले मारोती कवळे गुरुजी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नायगांव विधानसभा मतदारसंघात मला मारोती कवळे यांच्या रुपाने भाऊच मिळाला, असे यावेळी चव्हाण म्हणाले. जिल्ह्याचा विकास करणारी माणसं मला पाहिजेत, असे म्हणत त्यांनी आगामी काळात अनेक नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचे संकेत दिले आहेत.
Read Also :
- आमच्या मुळावर येणाऱ्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, वडेट्टीवारांचा इशारा
- … म्हणून शेतकऱ्याने थेट पंतप्रधान मोदींच्या आईलाच लिहिले पत्र
- ‘नागपूरचे ‘चड्डीवाले’ भविष्य ठरवू शकत नाही’, राहुल गांधींचे आरएसएसवर टीकास्त्र
- ‘भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच धडा शिकवू’, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा इशारा
- ‘राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली’