मुंबई : एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे अखेर भारतात आगमन झाले आहे. मात्र टेस्लाने महाराष्ट्राऐवजी कर्नाटकमध्ये आपले कार्यालय रजिस्टर केले आहे. ही दिग्गज कंपनी महाराष्ट्रात येण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते.
टेस्लाने बंगळुरूमध्ये आपल्या कंपनीची नोंदणी केल्यानंतर मनसे नेत्यांकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टेस्ला आपला नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारणार असल्याचे संकेत दिले आहेत.
.@Tesla ने R&D सेंटरसाठी कर्नाटकला पसंती दिली तरी ते त्यांचा नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक आहेत. @AUThackeray जी @Subhash_Desai साहेब व @iAditiTatkare ताईही टेस्लासह ई-वाहन कंपन्या आणण्यास प्रयत्नशील असून सरकारने नेमलेली एक समिती या कंपन्यांच्या संपर्कात आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 14, 2021
रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली की, टेस्लाने रिसर्च अँड डेव्हलेपमेंट सेंटरसाठी कर्नाटकला पसंती दिली असली तरी ते त्यांचा नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक आहेत. आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि रायगडच्या पालक मंत्री अदिती तटकरे टेस्लासह ई-वाहन कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यास प्रयत्नशील असून सरकारने नेमलेली एक समिती या कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने भारतात रजिस्ट्रेशन केलं आहे. कंपनी बंगळुरूमधून आपल्या व्यवसायास सुरुवात करणार आहे.
Read Also :