मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबादल करताना, हा निणर्य घेण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचं नमूद केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण संदर्भात पत्र लिहिले असून, ते पत्र आज त्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारींकडे सुपूर्द केलं. यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि दिलीप वळसे हेदेखील उपस्थित होते.
दरम्यान, भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यानी, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सर्वांनी समाजाच्या भावना लक्षात घेता, केंद्राला याबाबत विनंती करायचे ठरविले आणि त्यानुसार आज राज्यपालांना भेटून पहिले पाऊल टाकले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटणार असून, त्यांनाही एक पत्र देणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी त्यांनी मराठा समाजाचे कौतुक करताना, “मराठा समाजाने संयम पाळला, त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. आता मराठा समाजाला जाणीव झाली आहे, त्यांची लढाई राज्य सरकारविरोधात नाही. या लढाईत सरकारही त्यांच्यासोबत आहे. या समाजाच्या मागणीविरोधात कोणताही पक्ष नाही. त्यामुळे मी पूर्वी देखील मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत आणि आता आपल्या माध्यमातून परत धन्यवाद देतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, मराठा आरक्षणाचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयात टिकवायला आघाडी सरकारला अपयश आलं, कायदा फुलप्रूफ होता असं विरोधक सातत्याने म्हणत होते, यावर मुख्यमंत्र्यांनी, “फडणवीस सरकारचा कायदा फुलप्रूप असता, तर आज आम्हाला राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती. आज आम्ही पत्र दिलं आहे, त्याचं उत्तर काय येतं ते पाहू. त्याची प्रतीक्षा जनतेला आहे. राज्यपालही सहमत आहेत. त्यांनी पत्र वेळेत पोहोचवण्याचं आश्वासन दिल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Read Also :
- “राम राज्य”चे गाजर दाखवणाऱ्यांनी, देशाला रामभरोसे सोडून दिले
- “पाऊल पडले पुढे”; मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रपतींना पत्र, थोड्याच वेळात राज्यपालांनाही भेटणार
- उजनीचे पाणी पेटले : “आमचं पाणी चोरलंय; पालकमंत्री भरणे हे चोर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दरोडेखोर आहेत”
- “खोट्या आरोपांवरून हा अनिल देशमुखांचा, राजकीय छळ सुरु आहे”
- अनिल देशमुखांची होणार ईडीकडूनही चौकशी