पुणे – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी अर्थात जुन्नर येथे राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून कत्तलखाना मंजूर करण्यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अतूल बेनके यांनी पाठपुरावा केला.
त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींकडून महाविकास आघाडीसरकारसह राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांच्यावर सोशल मीडियामध्ये टीकेची झोड उठली आहे. जुन्नर नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामांकरिता विशेष अनुदान योजनेअंतर्गत निधी वितरीत केले आहेत. या अंतर्गत जुन्नर नगरपरिषदेला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामधून जुन्नरमध्ये ईदगाह सभामंडप, ईदगाह रस्ता, जनावरांचा कत्तलखानाआदी विकासकामे करण्यात येणार आहेत.
शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेमुळे घराघरांत पोहाचले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. लोकांनी मोठ्या विश्वासाने कोल्हे यांना निवडून दिले. ज्या भागातील १८ कत्तलखाने पोलिसांनी बंद पाडले. त्याठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार पाठपुरावा करुन कत्तलखान्याला निधी मंजूर करुन आणतात. यावर खासदार डॉ. कोल्हे अवाक्षर देखील बोलत नाहीत, ही शिवप्रेमींची निराशाच आहे, अशा भावना सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.
ज्याठिकाणी कत्तलखाना असतो तो स्थानिक मुस्लिम जनतेसाठी असतो पण येथील बीफ हे परप्रांतात जाते आणि परगावात जाते हे सरकारी धोरणाच्या विरुद्ध आहे यामुळे आम्ही याचा त्रीव्र निषेध करत आहे. मी शिवशंकर स्वामी मानद पशुकल्याण अधिकारी, महाराष्ट्र शासन )माझ्या अधिकारात आमदार अतुल बेनके यांच्या शिवजन्मभूमीतील कत्तलखण्याच्या १कोटी १० लाख रुपये तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन देणार आहे, अशी माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे शिवशंकर स्वामी यांनी दिली.