मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 6 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे. तसेच, त्यांनी राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असले तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असेही म्हटले होते. आता यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे छत्रपतींना कुणीही राजीनामा मागितला नाही. राजीनाम्याने प्रश्नही सुटणार नाही, असे प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केले.
प्रवीण दरेकर म्हणाले की, राजेंकडे कोणीही राजीनामा मागितला नाही. राजीनामा दिल्याने प्रश्नही सुटत नाही. हा उपाय असूच शकत नाही. मात्र, राजीनामा द्यावा की नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाच्या नावाने कोणीही राजकारण करू नये, असे ते म्हणाले.
संभाजीराजे यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, पक्ष काढावा की काढू नये किंवा आणखी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची सार्वत्रिक भावना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मराठा समाजाचे नेते काम करत आहेत. भाजपने त्याला पाठिंबा दिला आहे. आम्ही संभाजी छत्रपती यांच्या आंदोलनालाही पाठिंबा देत आहोत.
Read Also :