सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी सातारा पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. शंभूराज देसाई यांच्यावर दोन जणांकडून पाळत ठेवली जात असल्याचे समोर आले आहे.
गृहराज्यमंत्री वॉकला गेले असता दोन दुचाकीस्वारांकडून त्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जात होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सुरक्षरक्षकांना त्वरित माहिती दिली. आता याबाबत सातारा पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
याबाबत बोलताना गृहराज्यमंत्री म्हणाले की, मी मगाशी जरा बाहेर गेलो होतो. माझे गार्ड माझ्यासोबत होते. पण मोटरसायकलवर दोन लोकांनी दोन ते तीन वेळा मागेपुढे येऊन मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर मी घराजवळ आलो तर तिथेही ते रेकॉर्डिंग करताना दिसले. त्यामुळे मी लगेच सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती घेण्यास सांगितले.
वॉक करताना दोन माणसं संशयित वाटले. ते दोन-तीन वेळा मोटारसायकलेन पुढे गेले आणि परत मागे आले. मी याविषयी एसपींशी बोलतो. पण काळजी करण्यासारखं काही नाही, असेही ते म्हणाले.
Read Also :