पिंपरी-चिंचवड : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. यातच आता सरकारने 18 जिल्ह्यांमधील गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यात पिंपरी चिंचवडसह पुणे शहराचा देखील समावेश होता. मात्र आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुरवठ्याला यश आले आहे. कारण वाढत्या विरोधामुळे आता पुण्यातील गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडचे भाजप अध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती. तसेच, पुण्यातील इतर नेत्यांनी देखील या निर्णायाला विरोध दर्शवला होता. आता या मागणीला यश मिळाल्याचे दिसून येत असून, पुण्यात गृह विलगीकरण सुरूच राहणार आहे.
पिंपरी-चिंचवडसह प्रमुख शहरांमधील कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये निम्म्याहून अधिक रुग्णांनी गृहविलगीकरणातच उपचार घेतलेले आहेत. गृहविलगीकरणातील लोकांनी कोरोनावर मातही केली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असली तरी गृहविलगीकरण बंदीबाबत राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी महेश लांडगे यांनी केली होती. त्यानंतर आता विरोधानंतर पुण्यात गृह विलगीकरण सुरुच राहणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आमदार लांडगे यांनी गृह विलगीकरणाच्या निर्णयाला विरोध करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ई-मेलद्वारे पत्र देखील पाठवले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, सरकारने पुण्यातील गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
Read Also :
- शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा
- ‘म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराबाबतची सरकारची घोषणा फसवी’
- ‘भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या’
- ‘मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये’
- लक्षद्वीप प्रकरणी शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले…