मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सगळेच कॅबिनेट मंत्री मुंबईतल्या विकासकामांच्या उदघाटन सोहळ्यामध्ये व्यस्त असताना, तिकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या मुंबईतील निवास्थानी भेट घेतली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फडणवीसांनी स्वतः या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला असून, ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, राज्यात सध्या तापत असलेल्या मराठा आरक्षण, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण, ओबीसींचे रद्द झालेले स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण या विषयांच्या अनुषंगाने ही भेट त्यांनी घेतली असल्याची शक्यता असून, याचसोबत राज्यातील महामारीची स्थिती आणि त्यासंबंधीच्या राज्य सरकार राबवत असलेल्या उपाययोजना, राज्यात नुकताच परत एकदा वाढवण्यात आलेला लॉकडाऊन, आणि तौक्ते चक्रीवादळाच्या संदर्भातदेखील या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
Met Former Union Minister & Senior leader Shri Sharad Pawar ji at his residence in Mumbai this morning. This was courtesy meeting.
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/eqjabCHMh7— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 31, 2021
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर काही मोठया शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. यानंतर अनेक पक्षातल्या राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र, भाजपकडून कोणत्याही मंत्र्याने त्यांना भेट दिली नव्हती. त्यामुळे हे ही भेटीमागचे एक कारण असू शकते असे सांगितले जात आहे. मात्र, असे असले तरी राज्यातल्या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमागचे खरे कारण अजूनही गुलदस्त्यात असून, लवकरच याचे परिणाम राज्याच्या राजकारणात काय दिसून येतात, हे पाहावे लागेल.
Read Also :