मुंबई : राज्याच्या विधानसभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात परत सत्तांतराच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, पवारांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी, आधी भाजपत असणारे आणि आता राष्ट्रवादीमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे घर गाठले, यामुळे राज्यात आता लवकरच मोठा राजकीय भूकंप भाजप घडवून आणणार असे वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, हा भेटींचा सिलसिला सुरूच असून, आज एकनाथ खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी, खडसेंसोबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे देखील सोबत होते. खडसे यांनी या भेटी संदर्भात स्वतः ट्विट केले असून, पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.
आज मुंबईत @NCPspeaks चे अध्यक्ष आणि देशाचे नेते आदरणीय श्री शरदरावजी पवार @PawarSpeaks साहेबांची सदिच्छा भेट घेतली. शास्त्रक्रियेपश्चात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. @samant_uday जी उपस्थित होते. pic.twitter.com/wTSgPug3jG
— Eknath Khadse (@EknathGKhadse) June 2, 2021
दरम्यान, राज्यात सध्या तापत असलेल्या मराठा आरक्षण, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण, ओबीसींचे रद्द झालेले स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण या विषयांच्या अनुषंगाने ही भेट त्यांनी घेतली असल्याची शक्यता असून, याचसोबत राज्यातील महामारीची स्थिती आणि त्यासंबंधीच्या राज्य सरकार राबवत असलेल्या उपाययोजना, राज्यात नुकताच परत एकदा वाढवण्यात आलेला लॉकडाऊन, आणि तौक्ते चक्रीवादळाच्या संदर्भातदेखील या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
तसेच, एकनाथ खडसेंची विधानपरिषदेची आमदारकी देखील असून लटकलेली असून, राज्यपालांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिलेली नाही. या विषयावर देखील चर्चा करण्यासाठी आज त्यांनी पवारांची भेट घेतली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also :
- आमदार संजय शिंदेंची सोलापूर महापालिका राजकारणातील ढवळाढवळ काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंसाठी डोकेदुखी
- ‘पक्षाला उतरती कळा लागू नये म्हणून भाजप, सत्तेत येण्याची तारीख पे तारीख देत आहे’
- आमचा ‘राजा’ तुमच्या राजासारखं खोटं बोलत नाही
- कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये – सुप्रिया सुळे
- तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात