मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.
अनिल देशमुख यांच्या दोन खासगी सचिवांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती उघड झाल्यानंतर आता अनिल देशमुख यांचा नंबर आहे. अनिल देशमुख यांना समन्स बजावून २९ जून म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या कथित वसुली आदेशांचा आरोप केला आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. दोन खासगी सचिवांच्या अटकेनंतर देशमुखांवरही अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जातं.
सचिन वाझेनं ईडीला दिलेल्या जबाबात केला, अनिल देशमुखांबाबत मोठा खुलासा
“ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही (२९ जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी” अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स; अकरा वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
ईडीकडून शुक्रवारी १०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवास्थानी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर रात्री उशीरा त्यांना अटकही करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागून अगदी एक एक ड्रॉवर परत तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथुन देशमुख वरळीच्या घरी पोहोचले.
Read Also :
- पुणे महापालिकेत अजित पवारांचा मनमानी कारभार; महापौर मोहोळांचा बैठकीतून पत्ता कट
- राज ठाकरेंच्या लाडका श्वान जेम्सचं निधन; अखेरचा निरोप देताना ठाकरे भावूक
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला आमचा पाठिंबा; शिवसेना राष्ट्रावादी काँग्रेसने केला पुनरुच्चार
- “फडणवीसांवर विश्वास कसा ठेवणार? ‘तो अध्यादेश म्हणजे ओबीसींची फसवणूक”, खडसेंकडून हल्लाबोल
- मुख्यमंत्र्यांना मिळाला अजून एका मंत्र्याकडून लेटरबॉम्ब, केला काँग्रेस आमदारावर गंभीर आरोप