पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडला भेट दिली. या भेटीत भाजपामधील ‘नाराज’म्हणून ओळख असलेले नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत स्नेहभोजन केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शहराच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा रवि लांडगे भाजपाला सोडचिठ्ठी देणार…भाजपात भूकंप होणार…अशी चर्चा रंगली आहे.
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाला पुण्यात मोठा प्रतिसाद
मात्र, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी दोन पिढ्या जोडले असलेले रवि लांडगे भाजपातून बाहेर पडणार नाहीत. याउलट, रवि आपली नाराजी दाखवून भाजपामध्ये ‘बार्गेनिंग पॉवर’वाढवताहेत, असा दावा निष्ठावंत भाजपा आणि ‘आरएसएस’च्या गोटातून केला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. निवडणूक निकालापूर्वी पहिला निकाल हाती आला तो रवि लांडगे यांची बिनविरोध निवड झाल्याचा. त्यावेळी राष्ट्रवादीने त्यांना मदत केल्याचे सांगितले जाते. तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा रुजवण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेले कै. अंकुशराव लांडगे यांची पुण्याई कामी आली. मात्र, सत्ताकाळात भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी रवि यांना पदवाटपासाठी दुजाभाव केला. स्थायी समिती सभापतीपदाची अपेक्षा असताना डावलण्यात आले, अशी नाराजी बोलून दाखवली जात आहे. रवि लांडगे भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराज आहेत.
‘चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच भाजप सोडून सेनेत येण्याची शक्यता’
कोणी स्थानिक नेत्यांनी ‘प्राईव्हेट लिमिटेड पार्टी’करावी इतका भाजपा दुबळी नाही. कारण, प्रदेश पातळीवर पार्टीचे सक्षम नेतृत्व करणारे नेते आहेत. दुसरीकडे, निष्ठावंतांकडून कै. गोपिनाथ मुंडे यांचाही संदर्भ दिला जात आहे. ज्याप्रमाणे स्व. मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपा वाढवण्यासाठी संघर्ष केला. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला पाय रोवण्यासाठी कै. अंकुशराव लांडगे यांनी संघर्ष केला आहे. ज्याप्रमाणे स्व. मुंडे यांच्या पुढच्या पिढीवर भाजपामध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. तशीच कै. लांडगे यांच्या पुढच्या पिढीवर राजकीय अन्याय झाल्याचे बोलले जाते. मात्र, भाजपा नेत्या पंकजा मुंडे किंवा खासदार प्रितम मुंडे यांनी आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार म्हणून भाजपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. उलटपक्षी भाजपामध्ये संघर्ष करुन हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये रवि लांडगे यांच्यावर अन्याय होत असला, तरी भाजपासोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा विचार रवि करणार नाहीत. कारण, त्यांच्या कुटुंबाचा इतिहास संघर्षाचा आहे.
राष्ट्रवादीत कसं जमणार?
पिंपरी-चिंचवडमध्ये २०१४ मध्ये राष्ट्रवादीला मोदी लाटेत अपयश आले. त्यानंतर २०१७ मध्ये महापालिकेतील सत्ताही गेली. २०१९ मध्ये विधानसभेतही राष्ट्रवादीचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत पिंपरी आणि चिंचवडमध्ये पार्थ पवार पिछाडीवर राहिले. अशा प्रतिकूल परिस्थिती जे मोजके लोक राष्ट्रवादीसोबत राहिले. त्यांना २०२२ मध्ये महापालिकेत सत्ता आल्यानंतर अजित पवार महत्त्वाच्या पदांवर संधी देतील.
‘अजित पवारांचा खरा चेहरा उघडा पडला!’
राष्ट्रवादीचे पानीपत होत असताना अनेकांनी भाजपा- सेनेच्या जहाजात उड्या मारल्या. पण, ज्यांनी पवार कुटुंबियांशी निष्ठा ठेवून राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवडमध्ये जिवंत ठेवली. त्यापैकी काहीजणांना प्राधान्याने पदे मिळणे अपेक्षीत आहे. विठ्ठल उर्फ नाना काटे, राहुल भोसले, सुलक्षणा धर, पंकज भालेकर, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, विशाल वाकडकर असे अनेकांची नावे घेता येतील. मग, या स्पर्धेत रवि लांडगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली, तरीही मोठ्या पदासाठी ‘वेटिंग’च करावे लागणार आहे.
२०२४ चे गणितही अवघडच…
दुसरीकडे, रवि लांडगे भाजपातून राष्ट्रवादीत गेल्यास २०२४ मध्ये भाजपाविरोधात अर्थात आमदार महेश लांडगें विरोधात तगडा उमेदवार तयार होईल, अशी चर्चा केली जाते. पण, सध्यस्थितीला भोसरीचे माजी आमदार विलास लांडे २०२४ मध्ये निवडणुकीतून माघार घेतील का? कारण, राजकीय निवृत्तीपूर्वी एकदा विधानसभेत जाण्याची महत्त्वाकांक्षा लांडे निश्चितपणे ठेवणार आहेत. दुसरीकडे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी मतदार संघाच्या ‘प्लॅनिंग’ची जबाबदारी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यावर देण्यात आली आहे. मग, २०२४ ला विधानसभा उमेदवारीचा पहिला दावा गव्हाणेंचा राहणार आहे. तसेच, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, समाविष्ट गावांतील चेहरा म्हणून नगरसेवक पंकज भालेकर आणि माळी समाजाचा उच्चशिक्षित चेहरा म्हणून माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यासुद्धा रांगेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी २०२४ चं गणित कसं जमणारं? असा प्रश्न रवि लांडगे यांच्यासमोर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करुन चार-पाच जणांशी स्पर्धा करण्याऐवजी भाजपामध्ये राहून रवि लांडगे एकमेव स्पर्धक असलेले आमदार महेश लांडगे यांच्याशी दोनहात करतील, अशी पुष्टी राजकीय निरीक्षकांनी लावली आहे.
जुन्या भाजपाचा चेहरा रवि लांडगे…
महापालिकेतील सत्ता काळात जुन्या भाजपातील नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमर साबळे, अमित गोरखे, उमा खापरे, अनुप मोरे आदींना भाजपामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली आहे. आता जुन्या भाजपा नेत्यांमध्ये मोजक्या नेत्यांना संधी मिळालेली नाही. पण, जुन्या भाजपाचा निष्ठावंत चेहरा म्हणून रवि लांडगे ‘प्रमोट’होवू शकतात. त्याला प्रदेश पातळीवर मोठी ताकदही देण्याची तयारी दर्शवली जावू शकते. जुन्या गटातून ज्या नेत्यांनी पदे भोगली आहेत. ती सर्व मंडळी रवि लांडगे यांच्या पाठीशी उभा राहू शकते. ज्यामुळे जुना गटाची ताकद वाढवून दोन्ही आमदार अर्थात महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांना ‘कंट्रोल’करण्याची रणनिती आखली जावू शकते, असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
Read Also :
- राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला मुक्ती देऊ! प्रीतम मुंडेंचा निर्धार
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा होणार सर्व्हे; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादी नाराज? राऊतांचं स्पष्टीकरण
- कुणीही कायमचा शत्रू नाही, काहीही चमत्कार होऊ शकतो!
- मुख्यमंत्री म्हणाले ‘भावी सहकारी’, आज फडणवीस-जयंत पाटील एकाच गाडीत!