मुंबई : राज्य शासनाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. या निर्णयाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. यासंदर्भात आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना पत्र लिहित आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच, हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रयतेचा राजा छ.शिवाजी महराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलंय. आरक्षण इथल्या शोषित आणि मागासलेल्या समाजासाठी न्यायाचा आधार आहे. बहुजनांच्या हिताच्या बाबतीत आपले सरकार सतत गळचेपीचं धोरण राबवत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेण्याचा कोणताच नैतिक अधिकार महाविकास आघाडीला आता राहिलेला नाही, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
तुम्हाला आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतोय का? की बारामतीची जहागिरी?, असा सवाल देखील पडळकरांनी अजित पवारांना केला आहे.
आपल्या प्रस्थापित सरकारने सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिकेमध्ये जमा करायची कागदपत्रे आणि प्रमाणित डेटा सुद्धा आजतागायत जमा केलेला नाही, तसेच कोणताही निष्णात वकील ही नेमलेला नाही, यावरूनच आपल्या मनातील बहुजनांप्रतिचा आकस दिसून येतो. कदाचित तुम्हाला तुमच्या मर्जीतल्या काही खास अधिकाऱ्यांचीच सोय लावून टक्केवारी सरकारची वसूली वाढवायची म्हणून हा निर्णय घेतला असावा असा समान्य जनतेला प्रश्न पडतोय, असे पडळकर पत्रात म्हणाले.
आरक्षणाची गळचेपी करणारा शासन निर्णय काढणाऱ्या प्रस्थापितांच्या महाविकास आघाडी सरकारचा मी निषेध करतो.. धिक्कार करतो. सरकारने तातडीने मा. सर्वोच्च न्यायलयाच्या अनुमती याचिका क्र. 28306/2017 च्या अंतिम निकालाच्या आधीन राहुन मागासवर्गीयांच्या आरक्षणाची ३३ टक्के पदोन्नीची रिक्त पदे आरक्षित कोट्यातून बिंदू नामावलीनुसार भरण्याबाबत तात्काळ आदेश काढावा आणि १८ फेब्रुवारीचा २०२१,२० एप्रिल २०२१ व ७ मे २०२१ चा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा दिनांक २५ मे पासून मी मंत्रालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करेल, असा इशारा देखील पडळकरांनी दिला आहे.
Read Also :
- काँग्रेस नेत्यांनी ट्विटर प्रोफाइल बदलत पंतप्रधान मोदींना केला ‘हा’ सवाल
- ‘शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही’
- ‘अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला’
- … म्हणून पुण्यात आज लसीकरण पूर्णपणे बंद राहणार
- तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाहांनी घेतला तयारीचा आढावा