पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ‘विकासाची पोलखोल’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास १११११ रुपयांचे बक्षीसं देखील दिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सत्ताधारी भाजपने उडी घेत महाविकास आघाडी सरकारला आव्हान केले आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील अशाच प्रकाराची घोषणा केली असून राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव ‘विकासकाम दाखवा’ ही स्पर्धा अयोपजित केली आहे. पहिल्या तीन जणांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांच्या उखाळ्या-पाखाळ्या सुरू झाल्याने शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे.
पुणे शहरात प्रचंड खड्डे पडलेले असताना विविध प्रकारची विकासकामे केल्याचा खोटा दावा करत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात बहुतांश ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. त्यांचा हा विकासाचा दावा खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पोलखोल पुणे हा हॅशटॅग वापरून फेसबुक, ट्वीटर तसेच इन्स्टाग्रामवर समस्या दर्शवणारे छायाचित्र स्वत:च्या छायाचित्रासह (सेल्फी), चित्रफितीसह पाठवावे असे आवाहन केले आहे. पायाभूत सुविधांसह, कचरा, रस्ते, सांडपाणी, वाहतूक या संबंधीच्या समस्या या माध्यमातून कळविण्यात याव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.
यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेले काम दाखवा रोख बक्षीस मिळवा, या स्पर्धेची घोषणा केली आहे. दीड वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी एकही भरीव विकासकाम केलेले नाही. राज्यात भाजप सत्तेत असताना पुणे शहरात मेट्रो, पीएमआरडीएची स्थापना, पुणे विकास आराखड्याला मान्यता, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, बस खरेदी यांसारखी अनेक मोठी कामे झाली. याचीच भीती राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठीच ही स्पर्धा भाजपने घेतली आहे, असेही मुळीक यांनी सांगितले.
आमचं पाहून भाजपला जाग आली
गेल्या साडेचार वर्षात पुणे शहराची प्रचंड वाताहत झालेली असताना सत्ताधारी भाजपकडून शहरात खोट्या जाहिरातींचे बॅनर लावण्यात येत आहे. त्यामुळे, सुरूवातीला आम्ही स्पर्धेचे आयोजन केले होते. परंतू, दुर्दैवाने सत्ताधारी भाजपने बाराही महिने केवळ राजकारण करू पाहात आहे. आम्ही स्पर्धेची घोषणा करताच सत्ताधारी भाजपला जाग आली. त्यामुळे, त्यांनीही स्पर्धेचे आयोजन केले, असा हल्ला जगताप यांनी मुळीक यांच्यावर चढवला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या करण्यासाठी सरसावले आहेत. त्यामुळे, शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे.
Read Also :
- डॉ. स्वप्नील शिंदेंची आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, शासनाचे चौकशीचे आदेश
- उदयनराजेंचा गंभीर इशारा, “मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा! नाहीतर…
- अमर, अकबर, अँथनी हिट झाला तसं हे सरकारही हिट होणार! नाना पटोलेंचा पलटवार
- ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयाचा मनमानी कारभार, ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!
- भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेने राज्याला ‘हा’ धोका! संजय राऊत यांनी दिला इशारा