मुंबई : शरद पवार यांना सध्या विश्रांतीची गरज आहे, पण एक तर स्वतः पवारांना विश्रांती या शब्दाशी वैर आहे, दुसरे म्हणजे त्यांचे चाहते आणि विरोधकही पवारांना विश्रांती घेऊ देत नाहीत. पवारांचे चाहते देवेंद्र फडणवीस हे पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. ‘‘आता ही भेट नक्की कशासाठी झाली? काहीतरी राजकारण शिजत आहे. फडणवीस हे उगाच जाऊन असे भेटणार नाहीत. वरचा काहीतरी निरोप वगैरे घेऊनच फडणवीस गेले. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ आता नक्की,’’ असे फुगे सोडण्याचे काम परंपरेप्रमाणे सुरू झाले. श्री. फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे ही निव्वळ सदिच्छा भेटच होती व ते खरेच आहे, असं म्हणत इतर चर्चांना अग्रलेखातून पूर्णविराम देण्यात आला आहे.
‘महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वच पक्षांचे लोक ‘मातोश्री’वर जात असत. काही नेत्यांकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहायला हवे व आज श्री. शरद पवार त्यापैकीच एक प्रमुख नेते आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे पवारांना भेटले. यात वाकडा अर्थ काढण्याची गरज नाही. भेटले असतील तर बरेच झाले. बऱ्याच काळानंतर फडणवीस हे योग्य व्यक्तीला भेटले. त्या भेटीतून त्यांना नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल.’
फडणवीस आणि पवार यांच्यात काय चर्चा झाली असेल याच्या ‘पुडय़ा’ आणखी दोनेक दिवस सुटतील. पण जे पवारांना ओळखतात ते नक्कीच सांगू शकतील की, पवारांनी विरोधी पक्षनेत्यांची शाळाच घेतली असेल. विरोधी पक्षाने संकटकाळात कसे जबाबदारीने वागायला हवे याचे चोख मार्गदर्शन श्री. पवार यांनी विद्यमान विरोधी पक्षनेत्यांना केले असावे. सध्या महाराष्ट्रातला विरोधी पक्ष बेभान झाला आहे व विरोधासाठी विरोध हेच त्यांचे ध्येय ठरले आहे, असा जोरदार टोला देखील लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पाडायचे या एकमेव ध्येयापोटी विरोधी पक्ष काम करीत आहे व फडणवीसांचे इतर सहकारी अशी वक्तव्यं रोज करीत आहेत. शरद पवारांनीही अनेक सरकारे बनवली व पाडली असतील, पण आजचा विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यावर श्री. पवार यांनी फडणवीसांना नक्कीच चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील, असा सणसणीत टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.
Read Also :
- ‘मराठा आरक्षण आंदोलनात खासदार उदयनराजेंची पुढाकार घेण्याची तयारी’
- ‘चुकीचा आणि खोटा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही’
- लसीकरणातील अडचण दूर व्हावी यासाठी शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटशी चर्चा करणार
- ‘जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच’
- अनिल परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता?, ‘त्या’ रिसॉर्टची चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश