मुंबई : ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात, आज परत परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून, उच्च न्यायालयाने आज परत एकदा राज्य सरकारला ९ जूनपर्यंत परमबीर सिंग यांना अटक न करण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. याआधीही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला, २४ मे पर्यंत परमबीर सिंग यांच्यावर अटकेची कारवाई करू नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे आता परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक केली जाणार नाहीये.
आज सकाळी मुंबई उच्च न्यायालयात, न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे या गुन्ह्यावर ऑनलाईन सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाकडून हा निर्णय सुनावण्यात आला. तसेच, सिंग यांचे प्रकरण रेग्युलर कोर्टात चालवले जाणार असून, त्यांनी तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती यावेळी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
दरम्यान, अकोला इथे सेवेत असणारे पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात, भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती (ऍट्रॉसिटी) कायद्याच्या कलमांतर्गत, अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. तसेच त्यांच्यासोबत २७ इतर पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध देखील बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Also :