पुणे : आज पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महामारीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी आणि माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
“राज्य सरकार या काळात ऑक्सिजनच्या संकटावर विजय मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहे. तसेच, सरकार ३ हजार मॅट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी देखील प्रयत्न करत आहे. .मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना ऑक्सिजनचा किती पुरवठा केला, याची माहिती जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, “राज्यात महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पुण्यादेखील तिसऱ्या लाटेसाठीची पूर्वतयारी सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. देशात सर्व नागरिकांसाठी लसीकरण गरजेचे आहे. लसीकरणानंतर महामारीची तीव्रता आटोक्यात येत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे १० कोटींपर्यंत लस उत्पादन करण्याचं नियोजन असल्याचं ते बोलले.
यावेळी त्यांना, महामारी लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे, यावर मत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी, “जाऊ द्या आता काय करणार…पेट्रोल भरायला गेलं तरी फोटो असतो. तिथे फोटो असण्यामागे कदाचित हे कारण असेल की, त्यांच्या साक्षीने आपण शंभर रुपये लिटरने पेट्रोल भरत आहोत,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच,पुणे पालिकेचे गटनेते चुकीची माहिती देत आहेत ,असे सांगताना त्यांनी, “ग्लोबल टेंडर काढण्यासाठी पालिकेला राज्य सरकार परवानगीची गरज नसते. पालिकेने स्वत टेंडर काढायचे असतात”, असे सांगितले.
दरम्यान, ”भारत बायोटेकने लसींच्या उत्पादनासाठी पुणे जिल्ह्यात २० एकर जमीन मागितली आहे. त्यानुसार त्यांना जमीन देण्याच्या सूचना तातडीने देण्यात आल्या आहेत. लसीचे उत्पादन सुरू होण्यासाठी ३ महिने कालावधी लागेल. पण पुण्याला ही लस मिळावी यासाठी मी अधिकार्यांना प्रयत्न करायला सांगितले आहे,” असं अजित पवारांनी प्रामुख्याने नमूद केलं.
Read Also :