पुणे : अवघ्या काही तासातच कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कसबा पेठ मध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. तर चिंचवड मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे फक्त पुण्यातच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे. कारण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर थेट जनतेच्या दरबारातून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा हा पहिलाच सामना आहे.
हेही वाचा..“थोडी खुशी-थोडी गम अशी माझी अवस्था झाली”, पोटनिवडणुकांच्या निकालांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं आणि भाजपचं सरकार आलं. त्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखीच टोकाला गेला आहे. या संघर्षाची प्रचिती सुरुवातीला विधान परिषद निवडणुका आणि आता कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीमध्ये जाणवला. या निवडणुकीच्या निकालावर शिंदे गट, भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या निकालावरून राज्याच्या पुढील राजकारणाचा कल ठरणार असल्याचे मत राजकीय पंडितांनी व्यक्त केल आहे.
एकीकडे शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना जनतेतून सहानुभूती मिळत असल्याची चर्चा आहे. मात्र ही सहानुभूती खरंच मिळत आहे का ? त्याची लिटमस टेस्ट याच पोटनिवडणुकांमधून होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी करून सत्तेत येणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा प्रयोग जनतेला मान्य आहे का ? हे देखील या निवडणुकीमधून समोर येणार आहे. तिकडे हिंदुत्वाचा मुद्द्यावर शिवसेनेमधून बाहेर पडून भाजपसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार तर शिंदेंना सोबत घेणाऱ्या भाजपची देखील परीक्षा असणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीला जनतेतून मान्यता आहे का याचे उत्तर देखील याच पोटनिवडणुकीतून मिळणार असल्याने या दोन्हीही जागेवरील निवडणुका भाजप आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.
हेही वाचा..“पैशांचा पाऊस थांबला अन् आज मतांचा पाऊस झाला”, विजयी उमेदवार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
पुणे महापालिका निवडणुकीसाठी कसबा जिंकणे भाजपसाठी महत्वाचे
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यातील पोटनिवडणूक इतकी चर्चीसी होईल याची पुसटशीक कल्पनाही भाजपला नव्हती. त्यामुळे आधी बिनविरोध करा म्हणणाऱ्या भाजपने उमेदवार देताना घाई केली. उमेदवारी देताना केलेल्या सर्वे मध्ये टिळक कुटुंब यापेक्षा हेमंत रासने हे उजवे ठरले. त्यामुळे त्यांना उमेदवारी देखील मिळाली. हेमंत रासने यांच्या मदतीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रभारी म्हणून प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, माजी खासदार संजय काकडे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे यांच्यासह शहरातील शंभर पेक्षा अधिक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचं प्रचंड मोठं जाळं होतं. असं असताना देखील शहर भाजप या पोटनिवडणुकीत बॅक फुटला गेलं आणि त्यानंतर ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हातात घेतली. शेवटच्या क्षणी साम-दाम-दंड-भेद याचा वापर भाजपकडून करण्यात आला त्यामुळे शेवटच्या क्षणी ही पोटनिवडणूक निदान चूर्चीची तरी होऊ शकली.
“भाजपचा 28 वर्षाचा बाल्लेकिल्ला आघाडीकडून उद्धवस्त,” धंगेकरांचा रासनेंवर 11 हजार 40 मतांनी विजय
प्रामुख्याने या पोटनिवडणुकीत खासदार गिरीश बापट यांच्यानंतर शहर नेतृत्वाची पोकळी प्रकर्षाने जाणवली. महापालिकेत आणि संघटनेत विविध महत्त्वाच्या पदावर संधी मिळूनही हे पदाधिकारी निष्क्रिय ठरले. सांघिक नेतृत्वाचा प्रयोग अपयशी ठरला. त्याचबरोबर पक्ष संघटनेची बांधणी ही किती कमकुवत आहे आणि स्थानिक पदाधिकारी नेत्यांची जनतेशी नाळ कशी तुटली आहे हे या निवडणुकीतून अधोरेखित झाला आहे.
आता कसबा पोटनिवडणीचा निकाल काही लागला तरी आगामी महापालिका निवडणुकीवर या पोटनिवडणुकीचा मोठा परिणाम होणार आहे. प्रामुख्याने महाविकास आघाडीचे मनोबल वाढवणारी ही निवडणूक ठरली आहे. भाजपला रोखता येऊ शकतं असा संदेश या निवडणुकीतून गेला आहे. विशेष म्हणजे भाजपचे डोळे उघडणारी ही पोटनिवडणूक म्हणावी लागेल. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी आपल्या चुकांची दुरुस्ती करणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या कमबॅकला खो बसणार
पिंपरी चिंचवड आणि अजित पवार हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राने पाहिलेल आहे. मात्र 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपने आपली सत्ता काबीज केली आणि अजित पवारांचं वर्षानुवर्ष असलेलं वर्चस्व कमी झालं. त्यामुळे चिंचवड पोट निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवार यांना पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड मध्ये कमबॅक करण्याची मोठी संधी होती. त्या दृष्टीने अजित पवार यांनी पाऊलं देखील उचलली. शेवटच्या क्षणापर्यंत राहुल कलाटे यांना उमेदवारी देणार असल्याचं बोललं गेलं. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी निवडणूक लढवली आणि राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत अजित पवार यांची सगळी खेळीच बिघडवली. यानिमित्ताने अजित पवार यांचा पिंपरी चिंचवडच्या स्थानिक नेतृत्वावर किती विश्वास आहे हे देखील अधोरेखित झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील स्थानिक नेते माजी आमदार विलास लांडे, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल यांच्यावर अवलंबून न राहण्याची अप्रत्यक्ष रणनिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कायम ठेवली आहे. ‘‘आले तर आल्यासोबत नाही आले तर स्वत:च्या बळावर निवडणूक लढवायची आणि जिंकायची…’’ असा निर्धार राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी ठेवला. त्यामुळे निवडणूक निरीक्षण म्हणून जबाबदारी असलेले आमदार सुनील शेळके यांना मोठी संधी मिळाली. त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेप्रमाणे कामाची चुणूक दाखवली. त्यामुळेच सुरूवातील भाजपाकडे झुकलेली ही निवडणूक चुरशीची वाटू लागली. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी, रॅलीसाठी रस्त्यावर उतरावे लागले.
विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर स्थानिक पातळीवर ‘कंट्रोल’ करुन भाजपाचा सुपडासाप करण्याच्या आणाभाका करणारे ऐन निवडणुकीत मैदानातून गायब झाले. राजकीय रणनिती आणि प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवून विधानसभा आणि आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला विजयापर्यंत पोहोचवण्याचा वल्गना हवेत विरल्या. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर अजित पवार यांना पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा एकदा पक्ष संघटना बांधणीवर लक्ष देण्याची गरज असल्याचं या पोटनिवडणुकीतून समोर येत आहे.
एकूणच कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणूक या दोन्ही शहराच्या महानगरपालिका इतकच नाही तर राज्याच्या राजकारणाचा ट्रेंड सेट करणाऱ्या ठरतील असं म्हटलं जातंय. त्यामुळेच स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांसोबतच राज्यभरातील नेते गेल्या महिन्यापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तळ ठोकून होते. आता दोन मार्चला निकाल लागल्यानंतर राज्याचा राजकारणाचा कल नक्की कसा राहणार हे दिसेलच.
Read also
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्या विजय निश्चित; तब्बल ३५ हजार मतांधिक्यानी निवडून येण्याची शक्यता
- हेही वाचा..सभागृहात शरद पवारांचा ‘एकेरी’ उल्लेख, अजित पवारांनी हात जोडले, पण विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
- हेही वाचा…“नवाब मलिक देशद्रोही, मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम, सभागृहात अनिल परब कडाडले”
- हेही वाचा..“संजय राऊतांच्या मदतीला धावले शरद पवार,” हक्कभंगाच्या प्रस्तावावरून सरकारला सुनावले खडेबोल
- हेही वाचा..“चिंचवडच्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटेंना भाजपनेच..” अजित पवारांचा गंभीर आरोप