पुणे : खेडमधील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावरून शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी खेड येथे प्रत्यक्ष भेट देत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता मोहिते पाटील यांनी उत्तर दिले आहे.
खासदार संजय राऊत हे मोठे नेते आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणावरही बोलण्याचा त्यांच्याकडे परवाना आहे. ते पंतप्रधानांनाही धमकी देऊ शकतात. मी तर छोटा माणूस आहे. माझ्या तालुक्यात येऊन त्यांनी मलाही धमकी दिली आहे. त्यामुळे मी घाबरलो आहे. मला त्यांची भीती वाटते; म्हणून सरकारला मला आता पोलिस संरक्षण द्यावे लागेल, अशी उपरोधिक टीका मोहिते पाटील यांनी करत संजय राऊतांना उत्तर दिले आहे.
मोहिते पाटील म्हणाले की, मी मागच्या दाराने आमदार किंवा खासदार झालेलो नाही. मी लोकांमधून निवडून आलेलो आहे. त्यामुळे मला माजी आमदार करायचा निर्णय जनता घेईल. जनतेमध्ये जाऊन लोकांचा कौल घेतलेल्या एखाद्या नेत्याने, मला माजी आमदार करण्याची भाषा केली असती, तर बरे वाटले असते, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान, खेड पंचायत समितीमधील शिवसेनेच्या सभापतींवर आलेल्या अविश्वास ठरावाबाबत भूमिका स्पष्ट करताना खासदार संजय राऊत यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर खरमरीत टीका केली होती. तसेच अजित पवारांनी मोहितेंचा बंदोबस्त करावा नाहीतर शिवसेनेला मुभा द्यावी, असे संजय राऊत म्हणाले होते.
Read Also :