IMPIMP

रोहित पवारांचे रोखठोक मत, म्हणून पार्थ पवार निर्णय घेण्यात…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी, आज लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर आपली मते मोकळेपणाने मांडली. यावेळी त्यांनी त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याबद्दल देखील पहिल्यांदाच मोकळेपणाने आपले म्हणणे मांडले.

यावेळी त्यांनी, “पार्थबद्दल बोलायचं झालं तर तो मनाने फार चांगला आहे. निर्णय घेताना कधीकधी तो अचानक निर्णय घेण्याचा प्रयत्न तो करतो”, असं म्हणत पार्थ निर्णय घेण्यात कधीकधी घाई करतात, असं त्यांच्या निर्णय क्षमतेवरचं आपलं निरीक्षण व्यक्त केलं. परंतु, “आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकांसोबत विनोद करणं, भावंडं म्हणून एकमेकांची चेष्टा मस्करी करणं, हे सारं आम्ही करत असतो”, असं म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

तसेच, काही काळासाठी तुमच्यात दुरावा किंवा दोघांमध्ये मतभिन्नता झालेली, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी, “आमच्यात मतभिन्नता असल्याचा प्रचार प्रसारमाध्यांनी केला होता. त्यांना देखील बातम्या देणारे कदाचित विरोधकच असतील. विरोधकांकडून त्या पुड्या सोडण्यात येत होत्या. व्यक्तिगत पातळीवर आम्हाला दोघांना ठाऊक आहे आमचं नातं कसं आहे,” असं उत्तर रोहित यांनी दिलं.

यावेळी, पार्थ यांनी राजकारणामध्ये सक्रीय व्हावं असं वाटतं का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी, पार्थ हे सक्रीय असल्याचं सांगितलं. “पार्थ हे मावळ मतदारसंघामध्ये फिरत असतात. तिथले पदाधिकारी, आपला आमदार त्या ठिकाणी आहे. त्यांना जेव्हा एखादी अडचण येते, काही विषय कधीकधी अजित पवारांपर्यंत न्यायचे असतात, तर त्या ठिकाणी पार्थ हे पुढाकार घेतात. शेवटी काम होणं महत्वाचं आहे. काहीजण जे समाज माध्यमांवर सक्रीय असतात ते कामाचा जास्त बागुलबुवा करुन दाखवत मात्र, ते दाखवत नाहीत. प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते,” असं मत त्यांनी पार्थ यांच्या कामाबद्दल मांडलं.

Read Also :