पिंपरी । विशेष प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत महिला उमेदवारांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यापासून ग्रामपंचायत ते महापालिका सर्व ठिकाणी महिलांचा वरचष्मा राहिला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘नारी शक्ती वंदन विधेयक’’ संसदेत मांडल्यामुळे विधानसभा आणि लोकसभा सभागृहातही महिलांचा प्रभाव वाढणार आहे. पुरूष प्रस्थापित गड ढासळणार असून, महिलाराज पहायला मिळणार आहे.
भारताच्या इतिहासात तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये महिला आरक्षण विधेयक मांडले होते. मात्र, त्यावेळी संख्याबळाअभावी हे विधेयक मंजूर झाले नाही. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला विधेयक सादर केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) संख्याबळ पाहता हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे त्याचे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये काय पडसाद उमटतील? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“शरद पवार हा ब्रॅंड, नाव बदललं तरी इतिहास आणि कर्तृत्व तेच राहतं”
महाराष्ट्रात सर्वप्रथम महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या महाराष्ट्र विधानसभा सभागृहात सदस्यांची संख्या २८८ इतकी आहे. त्यापैकी केवळ २४ सदस्य महिला आहेत. लोकसभा सदस्य ४८ आहेत. त्यापैकी केवळ ८ सदस्य महिला आहेत. त्यामुळे देश आणि राज्याच्या राजकारणात महिलांना समान हक्क मिळावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
लोकसभा सभागृहात महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय चित्र बदलणार आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. यापैकी पिंपरी मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या तीनपैकी एक मतदार संघ महिला राखीव होईल. त्यामुळे पुरूष उमेदवारांना आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरावे लागणार आहे.
…तर कलाटे, काटे, भोईर यांची अडचण
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास शहरातील राजकीय गणिते बदलणार आहेत. चिंचवड महिला राखीव झाल्यास विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना संधी मिळेल. महाविकास आघाडीकडून या मतदार संघात सक्षम महिला उमेदवार नाही. दुसरीकडे, या मतदार संघातून तीव्र दावेदार असलेले भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना संधी मिळणार नाही किंवा कुटुंबातील महिला उमेदवार द्यावा लागणार आहे.
पिंपरी मतदार संघात बनसोडे, गोरखे, चाबूकस्वार यांचा धोका…
पिंपरी मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र, हा महिला राखीव झाल्यास विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची अडचण होणार आहे. या मतदार संघातून महिला उमेदवारीसाठी तीव्र दावेदार असलेल्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर, ज्येष्ठ माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांना संधी उपलब्ध होईल. दुसरीकडे, विद्ममान आमदार बनसोडे यांच्यासह भाजपाचे अमित गोरखे, शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांना क्षमता असूनही उमेदवारी मिळणार नाही किंवा कुटुंबातील महिला सदस्याला उमेदवारीसाठी तयार करावे लागणार आहे.
हेही वाचा…“पडळकरांच्या तोंडाला काळं फासा अन् एक लाख मिळवा,” राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांने केलं आवाहन
भोसरीत आजी-माजी आमदारांना धोका…
महिला विधेयकानुसार भोसरी विधानसभा मतदार संघ महिला राखीव झाल्यास भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांना धोका आहे. याउलट, शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे, राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांना संधी निर्माण होणार आहे. कदम आणि उबाळे यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवली आहे. लांडगे यांना आमदारकी राखायची असेल, तर महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘इव्हेंट’ ‘‘इंद्रायणी थडी’’ च्या संयोजिका त्यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे यांना उमेदवार म्हणून ‘लॉन्च’ करावे लागेल. दुसरीकडे, माजी आमदार लांडे यांच्या ऐवजी त्यांच्या सौभाग्यवती माजी महापौर मोहिनी लांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा पर्याय निवडू शकतात.
हेही वाचा…“तर तु पाटीभर शेण खाणार का ?” राणेंची पडळकरांची पाठराखण, मिटकरींचा नितेश राणेंना टोला
लोकसभा निवडणुकीचे चित्रही बदलणार…
लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार सघ आहेत. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारपैकी बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे प्रतिनिधीत्व करतात. उर्वरित तीनपैकी पुणे मतदार संघ स्व. गिरीष बापट यांच्या निधनामुळे रिक्त आहे. शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे आणि मावळमधून श्रीरंग बारणे प्रतिनिधीत्व करीत आहेत. पुणे, शिरुर आणि मावळ या तीनपैकी १ मतदार संघ महिला राखीव झाल्यास कोल्हे किंवा बारणे यांचा पत्ता कट होईल. विशेष म्हणजे, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांचा अपवाद वगळता लोकसभा निवडणुकीसाठी एकही सक्षम उमेदवार सध्यस्थितीला दिसत नाही. त्यामुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह मित्र पक्षांना लोकसभा निवडणुकीची तयारी करताना महिला उमेदवार कोण? यासाठी चाचपणी करावी लागणार आहे. पुणे महिला राखीव झाल्यास आमदार माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, स्वरदा बापट यांना संधी आहे. तसेच, मावळातून माजी महापौर उषा संजोग वाघेरे, माजी नगरसेविका शीतल नाना काटे, तसेच शिरुरमधून पूर्वा दिलीप वळसे-पाटील, आशा बचुके, रेखा मंगलदास बांदल, सुलभा उबाळे अशा रणरागिनींना संधी उपलब्ध होवू शकते.
READ ALSO :
हेही वाचा…“प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत ?” शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेलांचा फोटो चर्चेत
हेही वाचा…“नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत”,भाजपचा रोहित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…“श्रेय लाटण्यासाठी गुळाला मुंग्या चिकटाव्या तशा..,” सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“मोदींकडून कोट्यवधी महिलांचा भ्रमनिराश, २०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार नाही”
हेही वाचा…ठाकरेंचा आणखी एक हुकमी एक्का अडचणीत, खिचडी घोटाळा प्रकरणात ‘या’ नेत्याची चौकशी होणार