पुणे : पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये जोरदार बॅनरबाजी केल्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार डॉ. कोल्हे यांनी लक्ष घातले. सुमारे ४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करुन राष्ट्रवादीला नवसंजीविनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपा आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी वाढदिवसाचे निमित्त साधत संपूर्ण शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये ‘ब्रँडिंग’केले. त्यामुळे २०२४ मध्ये खासदार कोल्हे विरुद्ध आमदार लांडगे अशी लढत होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.
हिवाळी अधिवेशनच्या तारखा निश्चित, लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीची शहरातील विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी खासदार कोल्हे यांनी पुढाकार घेतला. भोसरी मतदार संघातील अंतर्गत रस्त्यांवर ४ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन गाजावाजा करुन करण्यात आले. यावर भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी थेट आक्षेप घेतला. सुमारे दीड कोटी रुपयांचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असताना त्याच रस्त्यावर १० लाख रुपये मंजूर करुन खासदार अमोल कोल्हे दीड कोटी रुपयांचा रस्ता १० लाखांत करायला निघाले आहेत. विशेष म्हणजे, कार्यादेश नसताना रस्त्याच्या कामांचे खासदार कोल्हे यांनी भूमिपूजन केले, असा आक्षेप नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी घेतला. कुंदन गायकवाड हे आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत.
कर्जतमध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना!
दुसरीकडे, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला असला तरी, भोसरी विधानसभा मतदार संघात सुमारे ३४ हजार मताधिक्य आहे. त्यामुळे २०२४ मध्ये भोसरीत पाया रोवण्यासाठी खासदार कोल्हे यांनी आतापासून मोर्चेबांधणी केली आहे.
संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई; राज्यात ९३७ बसेस धावल्या रस्त्यावर
महापालिका आगामी निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी भोसरीसह संपूर्ण शहरात ठिकठिकाणी विविध समाजपयोगी कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि उपक्रमांची ‘धडाका’ लावला होता. निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे भाजपाने जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून कार्यक्रमाची रेलचेल आणि फ्लेक्सचा धुरळा उडाला.
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज मंत्री मैदानात ; पुन्हा एकदा धावणार समझोता एक्सप्रेस?
दरम्यान, लांडगे यांचा वाढदिवस २७ नोव्हेंबर रोजी पार पडला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे वातावरण होवू लागल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी ही बाब मुंबईपर्यंत पोहोचवल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईतून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना ‘‘विशेष सूचना’’ दिल्या आहेत. त्यानुसार लांडगे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या ‘बॅनरबाजी’चा आता ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली होती. आमदार लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेले फ्लेक्स, बॅनर काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले होते.
पिंपरी-चिंचवड तो झाँकी है…शिरुर अभी बाकी है…
खासदार अमोल कोल्हे यांचे मनसुबे लक्षात आल्यानंतर आमदार लांडगे समर्थकांनी थेट शिरुर लोकसभा मतदार संघावर चढाई सुरू केली. शिरुरमधील हवेली, खेड, मंचर, इंदापूर, शिरुर आदी तालुक्यामध्ये दर्शनी भागात आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवस शुभेच्छांचे फ्लेक्स झळकले आहेत. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड तो झाँकी है…शिरुर अभी बाकी है…, अब की बार शिरुर मध्ये दादा खासदार… अशा घोषवाक्यांचा उल्लेख आमदार लांडगे यांच्या शिरुर लोकसभा निवडणुकीच दिशा दर्शवत आहे. त्यामुळे कोल्हेंनी भोसरीत घातलेले लक्ष आणि २०१९ मध्ये भोसरीतून आढळराव पाटलांना मिळालेले मताधिक्य पाहाता आमदार लांडगे यांची शिरुर लोकसभा मतदार संघातील मुसंडी खासदार कोल्हे यांची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे.
राष्ट्रवादी विरोधी गटाची जुळवाजुळव…
हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपा युवा मोर्चा पुणे ग्रामीणचे अध्यक्ष सुदर्शन चौधरी, उरळी कांचन येथील अजिंक्य कांचन, सुनील कांचन, वाघोली ग्रामपंचायतची सदस्य, ‘पीएमआरडीए’चे सदस्य स्वप्नील उंदरे, शिरुर भाजपाचे अध्यक्ष दादपाटील फराटे, हवेली भाजपा अध्यक्ष संदीप भोंडवे, सणसवाडी ग्रामपंचायतचे सदस्य, शिरुर पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, आंबेगाव येथील उद्योजक सतीश पाचंगे, हडपसरमध्ये विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जुन्नरमध्ये भाजपा नेत्या आशा बुचके, आंबेगाव भाजपाचे अध्यक्ष ताराचंद कराळे, ओझर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, कोरेगाव, कोंडापुरी, शिक्रापुर, तळेगाव येथील ग्रामस्थ, ग्रामपंचात सदस्य, बैलगाडा संघटनांचे पदाधिकारी, मंचर भाजपाचे पदाधिकारी संदीप बाणखेले, नवनाथ थोरात, जुन्नर भाजपाचे अध्यक्ष संतोष तांबे, पुणे महिला भाजपाच्या सुनंदा घाडगे, आंबेगाव येथील संजय थोरात, खेड भाजपाचे तालुकाध्यक्ष अतूल देशमुख, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद बुट्टे पाटील, शिवाजी मांदळे, पांडुरंग ठाकूर, शिरुरचे सतीश पाचंगे, जुन्नरचे गणेश बुट्टे अशी शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी विरोधी गटाची मोट बांधण्याचा प्रयत्न आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
Read Also :
- कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज मंत्री मैदानात ; पुन्हा एकदा धावणार समझोता एक्सप्रेस?
- कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीकडे लागले सर्व राजकीय पक्षांचे लक्ष
- बैलगाडा शर्यतीचा लढा: सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावनी; आमदार महेश लांडगे यांची माहिती
- दक्षिण अफ्रिकेतून एवढे लोक मुंबईत आले; आदित्य ठाकरेंनी सांगितला खळबळजनक आकडा
- सरकार पडणार असे म्हटलं तर कोणाच्या पोटात का दुखतं?; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोमणा