पिंपरी । विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सत्तेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याची धडपड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांची राजकीय गणिते राज्यातील सत्ता बदलामुळे पुरती चुकली आहेत. याउलट, आगामी काळात अंतर्गत खदखद उफाळून येणार असून, शहर राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ‘जोश’भरला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने भाजपाला नामोहरम करण्यासाठी बाह्या सरसावल्या होत्या. भाजपातील सुमारे २५ नाराज माजी नगरसेवक राष्ट्रवादी फोडण्याच्या तयारीत होती. त्यासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे मुंबई पक्ष कार्यालयातील दौरेही वाढले होते. मात्र, राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे स्थानिक राजकारणावर त्याचा परिणाम होणार आहे. वास्तविक, शहर राष्ट्रवादीतील संघटनात्मक बदलावरुन स्थानिक पातळीवर दोन मतप्रवाह आहेत. माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना महापालिका निवडणुका होईपर्यंत अध्यक्षपदी काम करण्याची संधी द्यावी. कारण, वाघेरे यांनी राष्ट्रवादीच्या पडत्या काळात (२०१४ ते २०१९) पक्ष संघटना जीवंत ठेवण्याचे काम केले होते, असा एक मतप्रवाह होता.
“तुमच्या 50 लबाडांना शेती सोसणार नाही, त्यापेक्षा पाटलांसोबत हिमालयात जा”; राष्ट्रवादीने डिवचलं
नवोदित अर्थात नव्या दमाच्या लोकांना संधी दिली पाहिजे. त्याद्वारे राष्ट्रवादीने भाजपाचा आक्रमकपणे विरोध केला पाहिजे. त्यासाठी अभ्यास आणि संघटन क्षमता असलेल्या नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मधल्या काळात वातावरण निर्मिती करण्यात आली. तत्कालीन शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि सहकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर माजी आमदार विलास लांडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीतील काहीजण भाजपासाठी काम करीत आहेत, असे चित्र निर्माण झाले होते. त्यातच संजोग वाघेरेंचा कार्यकाळही संपला होता. माजी आमदार विलास लांडे नवीन शहराध्यक्ष होतील, अशी अपेक्षा असताना ऐनवेळी नव्या दमाच्या अजित गव्हाणे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा पक्षश्रेष्ठींनी सोपवली. नव्या आणि जुन्या लोकांना सोबत घेवून संघटनेचे काम प्रभावीपणे करणार, असा दावा शहराध्यक्ष गव्हाणे यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही.
“संविधान सांगतो तोच सर्वश्रेष्ठ कायदा, नो हिटलरशाही, नो गैरयंत्रणा”; रूपाली पाटील
भाजपामधील नाराजांची मोट बांधून राष्ट्रवादीच्या माध्यमातून ‘प्रहार’करण्याची भूमिका शहराध्यक्ष गव्हाणे यांनी घेतली. किंबहूना, भाजपातील काही नाराज लोकांच्या सूचनेनुसार गव्हाणे राष्ट्रवादीची भूमिका ठरवू लागले. त्यामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंत कार्यकर्ते खासगीत नाराजी व्यक्त करु लागले. युवक राष्ट्रवादीतील काहीजणांनी थेट राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल आणि भाजपातील एकनाराज माजी पदाधिकारी यांच्या सल्ल्याने गव्हाणे यांनी रणनिती ठरवण्यास सुरूवात केली. माजी नगरसेवक वसंत बोराटे यांचा प्रवेश करुन त्याला काहीप्रमाणात यश मिळाल्याचे स्पष्टही झाले. मात्र, भाजपातील नाराजांशी जवळीक करण्याच्या प्रयत्नात गव्हाणे यांनी राष्ट्रवादीतील निष्ठावंतांची भूमिका विचारात घेतली नाही, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.
वाघेरे, लांडे यांची तटस्थ भूमिका…
माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटनेत तटस्थ भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. शहराध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागल्यामुळे वाघेरे नाराज आहेत. तर, २०१९ पासून राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत असतानाही योग्य संधी न मिळाल्यामुळे (विधान परिषद किंवा महामंडळ) लांडे कमालीचे शांत आहेत. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सत्तेत असताना स्थानिक नेतृत्त्वाला संधी दिली पाहिजे होती, असा दावाही केला जातो. राजकीय समंजसपणा दाखवत लांडे आणि वाघेरे यांनी याबाबत उघडपणे बोलणे टाळले आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी पिंपरी-चिंचवडकडे केलेल्या दुर्लक्षाबाबत हे दोन्ही नेते समाधानी नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तींकडून बोलले जाते.
“तर आम्ही तुमच्या पाया पण पडू”; अजित दादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया
आमदार आण्णा बनसोडेही अस्वस्थ…
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आण्णा बनसाडे आहेत. गेल्या अडीच वर्षांत पक्ष सत्तेत असताना आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक असतानाही बनसोडे यांना पदवाटपात संधी मिळाली नाही. किंबहुना, शहर संघटनेतील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत डावलण्यात आले. पिंपरी विधानसभा मतदार संघातील आगामी २०२४ च्या निवडणुकीची गणित डोळ्यांसमोर ठेवून आमदार बनसोडे यांना राजकीय कॉर्नर करण्याची भूमिका स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे बनसोडे कमालीचे अस्वस्थ होते. याशिवाय, ठेकेदार मारहाण प्रकरण आणि वादाच्या मुद्यांवर राज्याचे गृहमंत्रालय हातात असतानाही पक्षश्रेष्ठींनी साथ दिली नाही, अशी खंत बनसोडे समर्थकांमधून व्यक्त होते.
राष्ट्रवादी गटातटांमध्ये विखुरली…
एकेकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये एकहाती सत्ता ताब्यात ठेवणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता गटातटांमध्ये विखुरली आहे. संजोग वाघेरे गट, विलास लांडे गट, योगेश बहल गट, अजित गव्हाणे गट , आमदार अण्णा बनसोडे गट आणि आता निष्ठावंत राष्ट्रवादीचा गट असेच काहीसे चित्र पहायला मिळत आहे. आता राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काठावर असलेल्या अनेकांनी भाजपाच्या जहाजात उडी मारण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला पडझड रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
अमोल थोरात यांचे सूचक वक्तव्य…
राज्यात भाजपा व शिवसेना (शिंदे गट) सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहर संघटक अमोल थोरात यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आता १०० पार करणार आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेतील काहीजण भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी काळात पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार संबंधितांचा प्रवेश करुन घेण्यात येणार, हे निश्चित मानले जाते. भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, श्रींकात भारतीय आदींच्या थेट संपर्कात असणारे काहीजण कमळ हातात घेण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीसह शिवसेनेला संभाव्य फूट रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
Read also
- बंडखोर आमदाराची आदित्य़ ठाकरेंवर खिल्ली; म्हणाले, “त्यांच्या चष्मातून डोळे दिसतील तर..”;
- शिंदे सरकार मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा 12 जुलैला शपथविधी! कुणाला मिळणार संधी?
- “वसूली, अकार्यक्षम कारभार, भ्रष्टाचार व सुडाची अडीच वर्षे संपली”
- हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवेंच्या जिवितास धोका; त्यांची काळजी घेण्याचं राऊतांचं पोलिसांना आवाहन
- “लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात”; काॅंग्रेसची जहरी टिका