पिंपरी । विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ‘उपमुख्यमंत्री’पदाची शपथ घेतली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी पक्षाचे नेते शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासकीय वर्चस्वाला धक्का बसेल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात रुजू झालेले मावळते अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली झाल्याने स्थानिक प्रशासनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक खासदार बारणे यांचेच वर्चस्व राहणार आहे, असे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या महिला आमदार शिंदेंच्या वाटेवर
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि विकास ढाकणे असे अधिकारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुजू झाले होते, असे बोलले जाते. या तीन अधिकाऱ्यांनी भाजपा काळातील विकासकामांसह प्रस्तावित कामांना प्रशासकीय खोडा घातला होता. याचा फायदा थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना झाला. किंबहुना, भाजपाविरोधी वातावरण निर्मिती करण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्थानिक नेत्यांना मदतच केली, अशी टीका प्रशासनावर कायम झाली.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यासाठी चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे दावेदार राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ‘फिल्डिंग’ लावली होती. कलाटे यांच्या शिफारसीमुळे वाघ यांनी महापालिकेत ‘दरारा’ निर्माण केला होता.
हेही वाचा…अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का?
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार पडले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिफारसीमुळे राजेश पाटील यांची बदली झाली आणि त्याठिकाणी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली. याकामी साताऱ्यातील शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘शब्द’ टाकला होता, असे सांगितले जाते. शेखर सिंह यांच्या नियुक्तीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय ‘कंट्रोल’ अप्रत्यक्षपणे खासदार बारणे यांच्या हातात राहिला.
आता पुन्हा अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रशासकीय सूत्रे पालकमंत्री म्हणून देण्यात येतील. त्यामुळे प्रशासकीय वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, जितेंद्र वाघ यांच्या बदलीनंतर प्रशासकीय निर्णयांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक खासदार श्रींरग बारणे यांचा वरचष्मा राहणार, असे मानले जाते. कारण, बारणे यांनी वाघ यांची बदली करुन राहुल कलाटे आणि अजित पवार यांचा ‘हस्तक’ गारद केल्याचे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
हेही वाचा…महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा ? शिंदे-फडणवीसांनी ठरवला फॉर्म्युला
खासदार बारणेंचा ‘‘एक तीर दो निशाणा… ’’
अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात मावळ लोकसभा निवडणूक लाढवली आहे. या निवडणुकीत पवार यांचा पराभव झाला. आता भाजपा+शिवसेना+ राष्ट्रवादी अशी महायुती झाल्यामुळे राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारीवर दावा करणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे ‘‘कोणत्याही परिस्थितीमध्ये मावळातून पुन्हा मीच लढणार…’’ अशी भूमिका खासदार बारणे यांनी जाहीर केली. पिंपरी-चिंचवडमधील बारणे यांचे एकमेव कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून राहुल कलाटे यांची ओळख आहे. कलाटे आणि अजित पवार यांच्यात ‘पॉलिटिकल अंडरस्टँडिंग’ असल्यामुळे बारणेंचा बंदोबस्त करण्यासाठी पवार आगामी काळात कलाटे यांना ताकद देणार हे निश्चित आहे. त्याचा फटका बारणे यांना बसणार आहे. भविष्यातील धोका ओळखून बारणे यांनी कलाटेंचे प्रशासकीय वर्चस्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामाध्यमातून जितेंद्र वाघ यांची बदली करण्यात आली, अशी दबक्या आवाजात महापालिका वर्तुळात चर्चा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निलम गोऱ्हेंनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदे गटात केला पक्ष प्रवेश
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सहा आमदारांनी शरद पवारांना संपर्क साधला ? शरद पवार गटाचं संख्याबळ वाढलं
हेही वाचा…“अनेकवेळा मला उमेदवारीचा अर्ज भरायला लावला मात्र शेवटच्या क्षणी…,” पंकजा मुंडेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“अजित पवारांना सत्तेत घेण्यासाठी शिंदेंशी चर्चा केली नाही,” शिवसेनेच्या बड्या आमदाराचा आरोप, शिंदे गटाचं भवितव्य काय ?
हेही वाचा…83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात, उद्या शरद पवारांची पहिली सभा, अजित पवारांच्या भुमिकेकडे लक्ष